#कोफ्ताकरी सँलडसाठी हौसेने आणलेला जांभळा कोबी, आपण कितीही निगुतीनं ते सँलड बनवलं तरी कसंबसं चाखत माखत , हळूच आपल्या कडे तिरक्या नजरेनी बघत बघत नाईलाज झाल्यासारखं संपवतात 🙄, आणि फ्रिज उघडला की आधी हाच देखणा गड्डा डोळयासमोर यायचा म्हणलं हा जांभळ्याचा काळानीळा व्हायच्या आत काहीतरी करायला हवं. मग काढला बाहेर वरचे दोन थर काढले बाजूला आणि बारीक किसून घेतला यात चण्याचं पीठ आणि थोडं तांदळाचं पीठ घातलं, जीरे आलं लसूण कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या याची पेस्ट करून यात मिसळली, थोडी हळद, लाल तिखट, धनेजीरे पूड, थोडा हिंग व चवीनुसार मीठ व थोडी साखर घालून कोबीला जे पाणी सुटतं त्यातच मळून घेतलं व याचे गोळे बनवून तळून काढले. ग्रेव्ही साठी एक मध्यम आकाराचा टोमॅटो, दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून , ५/६ लसूण पाकळ्या व ७/८ काजू हे सर्व थोड्याशा तेलात परतून घेतले व थंड झाल्यावर याची पेस्ट बनवली. ही पेस्ट तेलात परतून यात थोडी हळद, लाल तिखट, किचनकिंग मसाला , चवीनुसार मीठ , चवीला थोडी साखर व अंदाजाने पाणी घालून उकळी आल्यावर यात तळलेले गोळे/कोफ्ते सोडले व ७/८ मिनिटं झाकण ठेवून वाफवले नंतर यात थोडी साय घातली व एक वाफ आणली मस्त कोफ्ताकरी तयार .